‘हा माझा अंत नाही; पेटेन उद्या नव्याने’ असा निर्धार करीत चेतन नरकेंची माघार
कोल्हापूर : विझलो जरी मी आज; हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही!’ असे म्हणत निवडणुकीच्या रिंगणातून आज जरी बाहेर पडत असलो तरी युवा पिढीला दिशा देण्याचे माझे काम चालूच राहील असा निर्धार डॉ. चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत सत्यशिल संदीप नरके उपस्थित होते.
कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात गेल्या दोन वर्षापासून उतरलेले डॉक्टर चेतन नरके यांना कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही. पक्षाचे पाठबळ असल्याशिवाय ही निवडणूक अशी अशक्य आहे. तब्बल संपूर्ण ११५० गावात संपर्क दौरे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांचे उंबरे झीजवूनही त्यांच्या उमेदवारीबाबत कोणीच गांभीर्याने घेतले नाही. यामुळे चेतन नारके माघारीची घोषणा करताना भावूक झाले. पण भविष्यात चार पावले पुढे झेप घेण्यासाठीची ही दोन पावले मागे आहेत. असेही त्यांनी सांगितले. काही अपरिहार्य आणि सामाजिक कारणामुळे माघार घेत असून माझ्या उमेदवारीबाबत जनतेचाही आग्रह होता पण अटीतटीच्या लढतीत पक्षीय ताकदच महत्वाची असते. मी माघार घेतली तरी कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नाही तर ८ मे नंतर ‘चेतन युवा सेतू संस्थे’ची स्थापना करून युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करणार. तसेच सामाजिक कला क्रीडा क्षेत्राचेही काम करणार असल्याचे सांगून आपली पुढील दिशा स्पष्ट केली.
डॉ. नरके पुढे म्हणाले गेली १९ वर्षे मी शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिका, आशिया आणि युरोपीय देशात राहिलो तेथील प्रगत शहरे पाहिली त्या तुलनेत कोल्हापूरची राजकीय उदासीनता, प्रबोधन, मार्गदर्शन, अभ्यासाची कमतरता यामुळे प्रगती खुंटली असल्याची जाणवते. याशिवाय औद्योगिक, पर्यावरण, रोजगार, सामाजिक स्वास्थ्य या समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी आपण अभ्यासपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि हेच माझे यापुढे काम सुरू राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षात सर्व गावांना भेटी देताना ग्रामीण भागाच्या समस्यांची जाणीव झाली त्या सोडवण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करीतच राहीन असे त्यांनी स्पष्ट केले
