‘रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे
                     मुंबई :  सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे ‘रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘रीलस्टार’ची निर्मिती जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली करण्यात येत आहे.  या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन करीत आहेत. ‘रीलस्टार’च्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचं शिवधनुष्य उचलण्यात आलं आहे. अशा महत्त्वपूर्ण चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी भूषण मंजुळेला मिळाली आहे. भूषणने यापूर्वी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘कारखानिसांची वारी’, ‘घर बंदूक बिर्याणी’ या मराठी चित्रपटांसोबतच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘रीलस्टार’च्या निमित्ताने तो प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  भूषणच्या निवडीबाबत सिम्मी जोसेफ म्हणाले की, आम्हाला नायकाच्या भूमिकेसाठी एक फ्रेश चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना नवखाही वाटता कामा नये. भूषणची अभिनयशैली उत्तम असून, या चित्रपटातील नायकाला तो व्यवस्थित न्याय देऊ शकेल
‘रीलस्टार’ची उत्कंठावर्धक पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. भूषणसोबत यात उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, महेंद्र पाटील, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार आहेत. बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हाडसे यांनी ‘रीलस्टार’मध्ये साकारलेल्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत.  गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांची गीते आहेत. संगीतकार विनू थॅामस आहेत.
