November 4, 2025

हातकणंगलेतील पंचरगी लढतीत कोणाला धोका? कोण सुरक्षित?

0
20240412_202233

कोल्हापूर  (विजय पोवार ) : भाजपचे सहयोगी सदस्य असलेले आमदार प्रकाश आवाडे  हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी अपक्ष  निवडणूक लढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. हा महायुतीसाठी धक्का आहे. या मतदार संघात पंचरगी निवडणूक  होण्याची शक्यता आहे. पंचरगी लढतीत कोणाला धोका? कोण सुरक्षित? याची उत्सुकता वाढत आहे.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगताना त्यांनी आता भाजपबरोबर नसल्याचेही स्पष्ट केले. आपल्या ताराराणी पक्षाची उमेदवारी घेत असल्याचे सांगितले. ही घोषणा करण्यापूर्वी महायुती आणि पर्यायाने भाजपबरोबर असलेले जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे आणि शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेशी त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे तिघांच्या सहमतीने प्रकाश आवाडे यांची उमेदवारी ठरली आहे का हे मात्र स्पष्ट नाही. कोरे-यड्रावकर यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खा. धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांनी निवडणूक सप्तरंगी झाली तरी मीच जिंकणार असे म्हणतं प्रचारास प्रारंभ केला. पण त्याच्या उमेदवारीला आवाडे पितापुत्रानी थेट विरोध दर्शवत महायुतीकडे राहुल आवाडे यांच्यासाठी उमेदवारी मागितली. ती त्यांना मिळाली नाही. अखेर अपक्ष म्हणून ते रिंगणात येत आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते पण घटक पक्ष होण्याचा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी नाकारला. पुढील वाटाघाटी फिसकटल्या राजू शेटटीं ‘एकला चालो रे ‘म्हणत रिंगणात आले. महाविकास आघाडीने शिवसेनेकडून माजी आ. सत्यजित पाटील (आबा ) यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचेशी जवळीक साधूनही वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरात काँग्रेसचे उमेदवार असलेले श्रीमंत शाहू महाराजांना पाठिंबा दिला आणि हातकणंगले येथे मात्र माजी जि. प अध्यक्ष डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली.
आता हातकणंगले मतदारसंघाच्या मैदानात पाच पैलवान लांग चढवून तयार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून माघारीच्या शेवटच्या दिवसा पर्यंत आणखीही घडामोडी होतील. पण हीच पंचरगी लढत झाली तर त्याचा फटका प्रामुख्याने राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांनाच बसणार अशी स्थिती आहे. सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचा वारू चौखुर उधळू लागला आहे. त्यांच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते स्वतः उमेदवार समजून धावत आहेत. राजू शेट्टी यांना शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता हाच आपला प्रचारक आहे आणि तोच विजयापर्यंत पोहचवणार असा ठाम विश्वास आहे. अर्थातच हातकणंगले तालुक्यात जातीनिहाय होणाऱ्या मतदानाचा परिणाम म्हणून जैन लिंगायत समाजाची मदारही त्यांच्यावर आहे. पण त्यातील बरीचशी मते वंचित आघाडीचे डी. सी. पाटील घेणार आहेत. आणि आता प्रकाश आवाडे आणि त्यांच्याबरोबर कोरे, यड्रावकर राहिले तर त्याचाही फटका राजू शेट्टी यांनाच बसणार आहे. तसेच हे तिघेही भाजपशी संलग्न असूनही वेगळा निर्णय घेत असतील तर त्याचा परिणाम धैर्यशील माने यांच्यावरही होणार आहे. यामध्ये आता भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्याकडून वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न झाले तरच महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांचा टिकाव लागणार आहे. त्यामुळे आता सर्वात सुरक्षित उमेदवार महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page