कोल्हापुरात फुटबॉल खेळाडू आणि संघांचा स्नेहमेळावा : कृष्णराज महाडिक यांचा पुढाकार
कोल्हापूर : पंचगंगा नदी तीरानजिकच्या कार्यालयात मंद संगीत सुरू होते. निमंत्रितांचे अगदी अगत्याने स्वागत केले जात होते. कोल्हापूर शहरातील फुटबॉल प्रिय तालीम, संस्था, प्रशिक्षक आणि फुटबॉलपटूंचे आगमन झाले. त्यांच्याशी खासदार धनंजय महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधला. फुटबॉल खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याची खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली. पहिल्यांदाच अशा प्रकारे फुटबॉल खेळाडूंसाठी स्नेहमेळावा पार पडला.
यावेळी फुटबॉल पंढरी मँचेस्टर सिटी या लॅबचे प्रशिक्षण, त्यांचे प्रशिक्षक, खेळातील नवनवीन तंत्र, यशस्वी होण्याचे मंत्र याविषयीची एक सुंदर चित्रफित भव्य स्क्रीनवर सादर झाली. उपस्थितांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर अस्सल कोल्हापुरी मेजवानीवर सर्वांनी ताव मारत, या स्नेह मेळाव्याचा आनंद लुटला.
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गेल्या २ वर्षापासून फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, दरवर्षी के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोल्हापूर शहरातील फुटबॉलपटूंच्या अनेक समस्या आहेत. त्या जाणून घेवून, खेळाडू आणि फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी, कृष्णराज महाडिक यांनी, या स्नेह मेळाव्याचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन केले होते. त्यासाठी पंचगंगा नदी जवळील गुरूकृपा कार्यालयात मंच सजवण्यात आला होता. कोल्हापुरातील विविध तालीम संस्था, फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि समर्थक आवर्जुन उपस्थित होते.
थ्री रेसिंग क्रीडा प्रकारात जगभरात लौकीक मिळवलेल्या कृष्णराजने, खासदार महोत्सवातंर्गत ४० खेळांचे आयोजन केले होते. खेळ आणि खेळाडूंविषयी आस्था असणार्या कृष्णराज यांना फुटबॉल खेळाचा विकास करायचा आहे. स्थानिक फुटबॉलपटूंना राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केले. त्यानंतर मँचेस्टर सिटी या जगप्रसिध्द फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचे खेळण्याचे तंत्र, तिथले स्टेडियम, खेळाडूंना मिळणार्या सेवा सुविधा, सरावाचे तंत्र, अपघातानंतर खेळाडूंसाठीच्या वैद्यकीय सुविधा, याविषयी माहिती देणारी चित्रफित सादर झाली. उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि तालीम संस्थांच्या पदाधिकार्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी देखील संवाद साधताना, आपण परदेशी फुटबॉल जवळून पाहिला, अनुभवलाय. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केवळ मैदान, प्रशिक्षक आणि चांगला आहार एवढयावर न थांबता, तर फुटबॉल खेळाडूंना चांगले मानधन मिळेल, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. या स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेल्या खेळाडूंशी खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधून, त्यांचीही मते जाणून घेतली. त्यानंतर सर्वांनीच अस्सल कोल्हापुरी मेजवानीचा आनंद घेतला. या स्नेहमेळाव्याला ४०० पेक्षा अधिक फुटबॉल शौकीन उपस्थित होते.
