November 2, 2025

सन मराठीवर १८ मार्चपासून नवीन मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’

0
IMG-20240315-WA0205
    कोल्हापूर : एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने या जोडीची लग्नगाठ बांधली जाणार, अशी ही अनोखी, मनोरंजक कथा घेऊन ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ वाहिनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही नवीन मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
   मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या ‘वाघमारे’ या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात.
    पोलिस होण्याचा एकही गुण तिच्यात नाही. उलट, कोणताही गुन्हा घडूच नये, अशी ती देवाकडे प्रार्थना करते.  खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता.  पण परिस्थिती अशी होती की तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले. आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते.
   एका प्रसिद्ध राजकारण्यासाठी काम करणारा सत्या, स्वभावाने अगदी रावडी, तो बोलण्यापूर्वी त्याचे हात पाय आधी बोलतात. पण मनाने तितकाच सच्चा. राजकारणावर इतका जीव की तो बेकायदेशीर कृत्य करतोय याची त्याला कल्पनाच नसते.  सत्याला त्याच्या सारखीच धाडसी पत्नी हवी आहे. त्याच्या लग्न मंडपातच, पोलिस एका वॉन्टेड गुन्हेगाराचा शोध घ्यायला पोहचतात. पोलिसांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतो, प्लॅननुसार कोणत्याही कामात रस नसलेल्या मंजूला नववधूच्या रूपात उभे केले जाते आणि जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत तिने वधूच्या ठिकाणाहून हलायचं नाही असा कडक आदेश तिला दिला जातो. पण कट रचला जात असताना, मंजूच्या लग्नाची गाठ सत्यासोबत बांधली जाते.
    आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का?  दोघांचं एकमेकांसोबत जमेल का?  सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल का? आत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का?  या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की मिळतील.
   संदीप जाधव निर्मित ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी  सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page