वाशी येथे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन २७ व २८ रोजी
कोल्हापूर – श्री राम ज्ञानपीठ (वाशी) संचलित राजवीर पब्लिक स्कूल व गुंफण अकादमी (मसूर, जि. सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे दि. २७ व २८ जानेवारी रोजी होत असलेल्या एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष बी. ए. पाटील व गुंफण साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी येथे दिली.
कोल्हापूर प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाशी येथील राजवीर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत असून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत या संमेलनाचे उद्घाटक आहेत. संमेलन स्थळाचे नाव राजर्षी शाहू महाराज साहित्य नगरी असणार आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात साहित्य चळवळीला प्रोत्साहन देण्याबरोबरच नव साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे व इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावात माय मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने राजवीर पब्लिक स्कूलची दशकपूर्ती व मराठी राजभाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून हे संमेलन आयोजित केले असल्याचे बी. ए. पाटील व डॉ. चेणगे यांनी सांगितले.
शनिवारी (दि. २७) संमेलनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत ‘लोकजागर’ हा कार्यक्रम होणार असून त्यात स्थानिक लोककलाकारांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन शाहीर रंगराव पाटील करणार असून उद्घाटक अभिनेते व निर्माते संजय मोहिते आहेत.
रविवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे व सरपंच शिवाजी जाधव यांच्या हस्ते पूजन होऊन श्री बिरदेव मंदिरापासून श्री राम पतसंस्थेपर्यंत ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पी. एन. पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, स्वागताध्यक्ष बी. ए. पाटील उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात डॉ. राजेंद्र माने यांचे अध्यक्षीय भाषण व कृष्णात खोत यांचे भाषण साहित्य क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल.
सकाळी अकरा वाजता ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचे लेखक व प्रसिद्ध पटकथा – संवाद लेखक प्रताप गंगावणे यांची प्रकट मुलाखत रंगणार आहे. ही मुलाखत प्रसिद्ध रंगकर्मी राजीव मुळ्ये घेणार आहेत.
दुपारी बारा ते एक या वेळेत ‘महिला सक्षमीकरण’ विषयावरील परिसंवाद होणार असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, गोव्यातील चित्रा क्षीरसागर, रजनी रायकर, आनंदा शिंदे (राशिवडे), भरत सुरसे (पुणे) सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. जे. के. पवार भूषवणार आहेत.
दुपारी दोन वाजता प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रणव कुरणे (कोल्हापूर), समीरा शेटे (कांडगाव), रिद्धी तेली (हळदी), वैभव चौगुले (कोपार्डे), साईराज जांभळे (खुपिरे), अनुष्का पाटील (देवाळे) सहभागी होणार आहेत. तीन वाजता प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत.
दुपारी चार वाजता संमेलनाचा समारोप समारंभ सुरू होणार असून त्यामध्ये गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे तसेच प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार भाई संपतराव पवार – पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. महादेव सगरे यांच्यासह गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, भोगावतीचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकुडे, कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला प्राचार्य जे. के. पवार, मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे हेही उपस्थित होते.
पुरस्कार विजेते – गुंफण जीवनगौरव पुरस्कार – प्राचार्य डॉ. जे. के. पवार, गुंफण गुणगौरव पुरस्कार – प्राचार्य डॉ. महादेव सगरे (पुणे), गुंफण साहित्य पुरस्कार – विनोद नाईक (गोवा)
गुंफण सामाजिक पुरस्कार – भीमराव अमृतराव तथा बी. ए. पाटील (वाशी), गुंफण सांस्कृतिक पुरस्कार – सुजीत शेख (सातारा), गुंफण सद्भावना पुरस्कार – प्रा. संजीव पवार (पुणे)
शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार – गुरुबाळ माळी
प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेतील विजेते (वर्ष २१ वे)
प्रथम – योगेश शिंदे, मुंबई, द्वितीय – प्रा. किशोर बुरंगे, अमरावती, तृतीय – संदीप मोरे, तारगाव (जि. सातारा
