November 2, 2025

कोल्हापूरात उच्चांकी गर्दीत शिवगर्जना महानाट्य सादर

0
IMG-20240114-WA0260

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत शिवचरित्रावर आधारीत महात्मा गांधी मैदानावर सादर झालेले शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी रविवारी उच्चांकी गर्दी केली. या भव्यदिव्य महानाट्यातील अंगावर शहारे आणणारे प्रसंग डोळ्यांत साठवण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिव चरित्रावर आधारित महानाट्याच्या 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होत आहे. सर्व नागरिकांसाठी मोफत प्रवेश असणारे शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी सोमवारीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
या महानाट्यातील 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांच्या शामियानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य पाहून ऐतिहासिक प्रसंग डोळ्यासमोर घडत असल्याची प्रचिती आली. शिवजन्म, शिवराज्याभिषेक आदी सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजी झाली. शिवचरित्राबरोबरच शिवकालीन सामाजिक, धार्मिक परिस्थिती लोकनृत्य आणि लोककलांच्या माध्यमातून मांडली आहे. कोल्हापूरच्या भुमीपुत्रांनी साकारलेल्या या महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव, दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी कोल्हापूरकरांना १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण इतिहास विविध प्रसंगातून उलगडला आहे.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आशिया खंडातील भव्य दिव्य महानाट्य शिवगर्जनाचे आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशीही महानाट्य सुरु होण्याआधीपासूनच शिवप्रेमींनी गर्दी केली. १० हजार दर्शकांची व्यवस्था केलेल्या महात्मा गांधी मैदानावर काही वेळातच सर्व खुर्च्या खचाखच भरुन गेल्या.

    Bमहानाट्य पाहण्यासाठी रविवारच्या सुट्टीमुळे तुफान गर्दी झाली. मैदानाच्या बाजूने लावलेल्या स्क्रीन वर देखील नागरिकांनी हे महानाट्य पाहिले. विद्यार्थी, युवक, युवती, महिला, पुरुष व वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील शिवप्रेमी महानाट्य पाहत शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार झाले. शिवरायांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याने विविध ऐतिहासिक प्रसंगातून शासनाकडून शिवरायांवरील महानाट्य प्रत्येक जिल्ह्यात मोफत नागरिकांना दाखविण्यात येत आहे.
शिवरायांची भूमिका साकारलेल्या विनायक चौगुलेला प्रेक्षकांची दाद
शिवगर्जना महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या विनायक चौगुले यांच्या भूमिकेला दर्शकांनी भरभरुन दाद दिली. घोड्यावर बसून दर्शकांमधून केलेली एंट्री खूपच रोमांचकारी ठरली. याचबरोबर जिजाऊंच्या
भूमिकेत दीपाली हंडे, अफजलखान – शकील पटेल, शहाजी महाराज – सुहास चौगुले, औरंगजेब – मदन मस्ते, खिलजी – ओंकार चव्हान, बाल शिवाजी – कौशिक भावे, निवेदक – शाहीर राम गुरव, शाहीर – शुभम वाघे, बाजीप्रभू देशपांडे- ओंकार पंडित यांनाही दर्शकांकडून टाळ्या मिळाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page