शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ आवश्यक : शितल मगदूम
कोल्हापूर : “शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी खेळात सहभागी होणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे विद्यार्थी खेळापासून दूर गेला आहे. विद्यार्थ्यांनी यापासून अलिप्त राहून व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन सरपंच शितल मगदूम यांनी केले. शिये (ता.करवीर) येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिये संचलित शिये हायस्कूल जुनियर कॉलेजच्या शालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री हनुमान सेवा संस्थेचे संचालक सुदर्शन गाडवे होते.
सुदर्शन गाडवे म्हणाले” क्रीडा महोत्सवामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने सहभागी होऊन खिलाडी वृत्तीने खेळ खेळायला पाहिजे. जीवनात हार-जीत पचवणे गरजेचे आहे यासाठी शालेय जीवनापासून क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे”
पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वज व क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानाचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक के. व्ही .बसागरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन सुनिता नेर्लेकर यांनी केले. जिमखाना प्रमुख एस. जी. पाथरे यांनी क्रीडा स्पर्धेचे संयोजन केले. आभार सौ .सुवर्णा पवार यांनी मानले.
