पद गेल्याने मुरलीधर जाधव यांना अश्रू अनावर
कोल्हापूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद गेल्याने मुरलीधर जाधव यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. निष्ठेने काम केल्यानंतर तडकाफडकी पदावरून हटवल्यामुळे त्यांनी उद्विग्न होउन आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकसभेला उमेदवारी मागितली यात माझे काय चुकले?उपऱ्यांना संधी दिली तर माझ्यासारख्या निष्ठावंतांनी गोळी घालून घ्यायची का? असे उद्विग्न सवाल करून त्यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर, सुषमा अंधारे आणि अरुण दुधवडकर यांचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. यापुढेही मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला विराम दिला.
मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्याचे वृत्तपत्रातील बातम्यातूनच त्यांना कळाले आणि अपेक्षित धक्का बसला. याबरोबरच राजू शेट्टींवरील टिका आणि शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा यामुळे ते आणखी हतबल झाले. आज त्यांनी कोल्हापुरात प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत पुढील दिशा स्पष्ट केली.
ते म्हणाले १९ वर्षे मी शिवसेनेत विविध पदासह जिल्हाप्रमुख म्हणून निष्ठेने काम केले. शिवसेना फुटल्यानंतर राज्यात विक्रमी संख्येने शिवसेनेची प्रतिज्ञापत्र दिली. यामध्ये माझ्या घरातील सर्वांची प्रतिज्ञापत्रे आहेत. या उलट डॉक्टर मिणचेकर यांनी स्वतःचे आणि पत्नीचेही प्रतिज्ञापत्र दिले नाही. ते स्वतः ६७ एकर जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. तर माझी एमआयडीसीतील एक जागा सरकार बदलल्यामुळे अडकली. याबाबत उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने उद्योग मंत्री उदय सामंत यांना भेटलो. तरीही त्यांनी त्याचे भांडवल केले.
मिणचेकर यांनी सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध कट केला. ते स्वतः शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक होते. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केले. राजू शेट्टी शिवसेनेची मते घेऊन खासदार झाले. पण नंतर ते भाजपबरोबर गेले. शिवसेनेसाठी ते उपरेच आहेत. म्हणूनच निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्या या उपऱ्याना नको म्हटले तर माझे काय चुकले?
मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील यापैकी कोणालाही लोकसभेला उमेदवारी दिली तर मी जिवाचे रान करून निवडून आणतो. पण उपरे असलेल्या राजू शेट्टींना मात्र उमेदवारी देऊ नये. मी अजूनही ठाकरे गटाच्या शिवसेनेतच आहे. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर माझी निष्ठा आहे मी पक्ष सोडून कोठे जाणार नाही असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
