चिटणीस मारहाण प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल : 8 जणांना अटक
कोल्हापूर : राजाराम सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या मारहाण प्रकरणी कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि आमदार सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह 15 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील डॉ. नेजदार यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चिटणीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याने कारवाई केली आहे.
आ. सतेज पाटील यांच्या गटाकडून माराहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाचा पराभव झाला. या पराभवाला कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस जबाबदार असल्याचा राग मनात धरून त्यांना जिवे मारण्याचा कट रचून चिटणीस यांची गाडी अडवण्यात आली. चिटणीस यांना लाथा-बुक्क्यांनी, तोंडावर, पाठीवर, पोटात, गळ्यावर, पायावर मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीनंतर तक्रारदार चिटणीस यांच्या गळ्यातील एक लाख किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चेन, रोख एक हजार रुपयेही नेल्याची तक्रार दिली आहे. तसेच गाडीचेही नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. संदीप विलास नेजदार, बबलू विश्वास नेजदार, युवराज बाजीराव उलपे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, तुषार तुकाराम नेजदार, कौस्तुभ कमलाकर नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, श्रीप्रसाद संजय वराळे, प्रवीण बाबूराव वराळे (सर्व रा. कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर आठ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सांगितले.
