भूमी अभिलेख अधीक्षक चालकासह लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात
कोल्हापूर : भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव याला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले. त्याच्या वाहनावरील चालक उदय शेळके हा देखील या जाळ्यात अडकला. सोन्या मारुती चौकातील भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी (दि. २) दुपारी ही कारवाई झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केलेल्या व्यक्तीला त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा अधीक्षक सुनील जाधव यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत आर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर उपअधीक्षक सरदार नाळे यांनी मंगळवारी दुपारी सोन्या मारुती चौकातील भूमी अभिलेखच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना अधीक्षक जाधव आणि त्याच्या वाहनावरील चालक शेळके या दोघांना पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. वरिष्ठ अधिकारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली.
