महाराष्ट्रात दीड वर्षात लोक हिताचे निर्णय : आरोग्य मंत्री, तानाजी सावंत
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली, नोकर भरतीचे प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा कायापालट केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी कोल्हापूर येथे केले. ते गारगोटी तालुका भुदरगड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते.
30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटा असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 15 कोटी रुपयांच्या नविन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीचे लोकार्पण आरोग्य मंत्री, डॉ. तानाजी सावंत यांचे हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांचे सह स्थानिक पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे, जिल्हा व तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते.
