आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला कोल्हापुरात अपघात
कोल्हापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला कोल्हापूर-जोतिबा रोडवर राजपूतवाडीजवळ अपघात झाला. या मध्ये मंत्री सावंत यांना कसलीही इजा झाली नाही पण त्यांचे स्वीय सहाय्य्क किरकोळ जखमी झाले.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. गारगोटी येथील आरोग्य केंद्रातील कार्यक्रम आटोपून ते कोल्हापूर शहरात आले. याठिकाणी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले आणि त्यांचा ताफा जोतिबाकडे निघाला होता. जोतिबा दर्शन घेऊन ते पुण्याकडे रवाना होणार होते. त्यांचा ताफा राजपूतवाडीजवळ आला असता त्यांची गाडीची ठोकर दुसऱ्या गाडीला बसली. गाडी रस्त्यावरून कडेला आली. यामुळे गाडीचे किरकोळ नुकसान झाले तर त्यांचे स्वीय सहाय्यकही किरकोळ जखमी झाले. ताफ्यात पायलटसह पोलीस बंदोबस्त होता पण रुग्णवाहिका नव्हती. या निमित्ताने आरोग्य मंत्र्यांनाच अपघातात प्रथमोपचाराच्या काय सोयी सुविधा असाव्यात याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.
