कोल्हापूर शहराचा 2030 पर्यंतचा आराखडा करावा : आ. सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये २०३० पर्यंत दीड कोटी चौरस फूट बांधकाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये अपार्टमेंट, बंगलो, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि वाणिज्य मिळकतींचा समावेश असणार आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून या घटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, ड्रेनेजची सुविधा, वीज पुरवठा आणि आवश्यक रस्त्यांचा संभाव्य आराखडा तयार करावा अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने नागाळा पार्क येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांची महापालिका अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत आमदार पाटील यांनी २०३० मधील कोल्हापूरचे चित्र डोळ्यासमोर ठेवून आवश्यक त्या पायाभूत सुविधा कशा उपलब्ध करता येतील, त्या संदर्भात काय काय उपाययोजना गरजेचे आहेत या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी आराखडा करावा. हा आराखडा करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात जी शहरे गतीने विकसित झाली आहेत तेथील अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चाही करावी असेही पाटील यांनी सांगितले.
महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आपण स्वतः या संदर्भात मोठ्या शहरातील अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करू असे सांगितले. ” कोल्हापूर २०३०” डोळ्यासमोर ठेवून शहराचे मॅपिंग होणार आहे आणि हे मॅपिंग येथे तीन महिन्यात पूर्ण करावे. हा आराखडा तयार करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रीडाई, आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकारी व सभासदांची बैठक होणार आहे. आमदार पाटील यांनी यासंदर्भात क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत व आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराने यांच्याशी यापूर्वी चर्चा केली आहे. लवकरच महापालिकेचे अधिकारी, क्रीडाई आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होईल असेही पाटील यांनी सांगितले.
सध्या कोल्हापुरातील ९० लाख चौरस फुटाच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे येत्या काही महिन्यांमध्ये आणखी ५० लाख चौरस फूट बांधकामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी दाखल होतील इतक्या गतीने काम सुरू आहेत. सद्यस्थितीची आकडेवारी पाहता २०३० पर्यंत कोल्हापूर शहरात तब्बल दीड कोटी चौरस फूट असे बांधकामे होतील. कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये सध्या रिकन्स्ट्रक्शनचे काम जोरात सुरू आहे. ह्या साऱ्या मिळकतधारकांना, फ्लॅटधारकांना व कमर्शियल मिळकतींना पाणी, ड्रेनेजची आणि वीज पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय रस्ते आणि पार्किंगचा विषय आहे.अशा साऱ्या घटकांचा आराखडा तयार करून पुढील नियोजनाच्या अनुषंगाने पावले टाकावीत अनुषंगाने अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली.
